बीजिंग – चीनच्या हेइलोंगजियांग प्रातांची राजधानी हार्बिन येथे एका इमारतीत झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चीनच्या अधिकृत माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी शिन्हुआ समाचारला सांगितले. पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यारील सदनिकेत स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. गॅसच्या गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्फोटामुळे त्या फ्लॅटची बाल्कनी आणि अन्य फ्लॅटच्या खिड्क्यांचे नुकसान झाले. आवाजामुळे घबराट निर्माण झाली आणि तेथील रहिवाशींनी बाहेर धाव घेतली. सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट होण्याच्या घटना चीनमध्ये सातत्याने घडत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या मार्च महिन्यातही उत्तर हैबई प्रांतात एका रेस्टॉरंटमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता तर २६ जण जखमी झाले होते. स्फोटामुळे इमारतीचा भाग खाली कोसळला होता व त्यात त्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.