Devendra Fadnavis | Rohit Pawar | Indapur। पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले आहेत.
मात्र, जनतेने आवाज उठवल्यामुळे जामीनावर सोडलेल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भातील एक ट्विट देखील शेअर केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’
गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही… pic.twitter.com/5KTBQyl5KV
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2024
देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, ‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.
गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या.!’ असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.