Dombivli blast case – डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी पहिली अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक हे फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मोबाइलचे लोकेशन ट्रेस केले आणि नाशिकमधून त्यांना शोधून काढले. मुख्य आरोपी मालती मेहता यांनी नाशिकमध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता.