Pune Porsche Car Accident Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी असे निलंबित करण्यात आलेल्याची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी याबाबत आदेश दिला आहे.
शनिवारी मध्यरात्री कल्याणी नगर आलिशान कारने दिलेल्या धडकेत अभियंता तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जमावाने कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला बेदम चोप देऊन या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती. यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच तोडकरी यांनी या अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे यांना दिली होती.
यानंतर जगदाळे हे सुद्धा घटनास्थळी आले होते. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शनी अल्पवयीन कार चालकाला चोप दिला होता. नियमानुसार अशा वेळी पोलिसांनी त्याला रुग्णालयात घेऊन जायला हवे होते. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या जगदाळे आणि तोडकरी हे त्याला येरवडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
तसेच याप्रकरणाची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास द्यायला हवी होती ती दिली नाही. तसेच नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनाही अपघाताची माहिती दिली नाही. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासावर संशय निर्माण झाला होता.