इस्लामाबाद- पाकिस्तानच्या खैबर पख्तूख्वा येथे मार्च महिन्यात झालेल्या एका आत्मघाती बॉम्बहल्ल्यात पाच चीनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या नागरिकांच्या कुटुंबीयांना २.८ लाख डॉलर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. त्या देशाच्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
२६ मार्च रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाच चीनी नागरिकांसह पाकिस्तानी वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. हे एका कारने जात असताना स्फोटकांनी भरलेली एक कार त्यांच्या कारला येऊन धडकली होती. चीन नागरिक दासू हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन या आपल्या कामाच्या स्थळी जात असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.
दरम्यान, चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या संदर्भातील संयुक्त समितीची उद्या बैठक होणार आहे. त्यापूर्वीच पाकिस्तानने हा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर करून टाकला आहे. पाकिस्तानमध्ये चीनकडून अनेक प्रकल्पांचे काम सुरू असून त्यात हजारो चीनी नागरिक काम करत आहेत. चीनने पाकिस्तानला मोठे कर्जही दिले आहे.
एकप्रकारे पाकिस्तान आता चारही बाजूंनी चीनच्या बोजाखाली दबला आहे. तथापि, त्यांना चीनलाही नाराज करण्याची इच्छा नाही. चीनी नागरिकांना ठरवून पाकिस्तानात लक्ष्य केले जाण्याच्या घयना घडत आहेत. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरिफ पुढच्या महिन्यात चीन भेटीवर जाणार आहे. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो म्हणून खबरदारी म्हणून अगोदरच पाकने नुकसान भरपाई जाहीर केली आहे.