पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकत कर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची आणि वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली आहे. शहरातील तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा थकीत कर आहे. हा कर वसूल करण्यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ज्या निवासी मालमत्ता बंद आहेत त्या सील करण्यात येत आहेत. ज्या निवासी मालमत्तांमध्ये नागरिक वास्तव्य करतात, अशा थकबाकीदारांकडे 5 किंवा 10 वर्षांपासून कराची थकबाकी आहे. अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजे कार, टीव्ही आदी महत्वाच्या वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिला आहे.
शहरात 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार 971 मिळकत धारकांना यापूर्वीच जप्तीच्या नोटीस कर संकलन विभागाने पाठविल्या आहेत.
याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त देशमुख म्हणाले, तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा थकीत कर आहे. 1 लाखांच्यावर थकीत असलेल्या मालमत्तांची संख्या 8 हजार 791 आहे. त्यापैकी 691 मिळकतधारकांना जप्ती अधिपत्रे पाठविली आहेत. अधिपत्र मिळताच 483 नागरिकांनी कर भरला आहे. तर 200 मालमत्ता सील केल्या आहेत. थकीत कर असलेल्या मालमत्ता धारकांनी त्वरीत कर न भरल्यास जप्तीची कारवाई अटळ आहे. त्यामुळे त्यांनी त्वरीत थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
मिळकत कर भरण्यासाठी महापालिका पाठवतेय लिंक
नागरिकांना घरबसल्या जास्तीत-जास्त सुविधा देण्याचा महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आत्तापर्यंत मिळकत हस्तांतर, ना हरकत दाखला या महत्वाच्या सुविधांसह कर भरणे वगळता सर्वच सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना मोबाइलवर, ई-मेल आयडीवर कुठेही असताना कर भरण्यासाठी कस्टमाइज पेमेंट लिंक पाठवित आहे. त्या लिंकवर क्लिक केले की नागरिकांचे बिल उघडते. त्यानंतर नागरिक कर भरू शकतात. नागरिकांनी मिळकत कराच्या बिलाशी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी जोडावा आणि सर्व सेवांचा घरबसल्या लाभ घ्या, असे आवाहनही सहायक आयुक्त देशमुख यांनी केले आहे.