980 बेरोजगांरांना नोकरीची संधी; 1117 तरुणांची स्किल डेव्हलपिंगसाठी झाली निवड
भोर : भोर येथे आमदार संग्राम थोपटे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रोजगार महामेळाव्यात 980 बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असून, 1 हजार 117 तरुणांची 15 दिवसांच्या स्किल डेव्हलपिंग ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आली असल्याचे संयोजकांनी सांगितले.
अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्रांगणात आमदार संग्रामदादा थोपटे गौरव समितीतर्फे आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 2 हजार 567 बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नावनोंदणी केली होती. यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, अशोकराव ऊर्फ बाळासाहेब थोपटे, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, युवा नेते पृथ्वीराज थोपटे, प्रा.विनय कुलकर्णी, प्रा. किरण रहाणे, प्रा. काकासाहेबा कोरे, राहुल खामकर,
माजी नगराध्यक्षा गीतांजली शेटे, ऍड. विश्वनाथ रोमण, अनिल सावले, पंढरीनाथ भिलारे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन हर्णसकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, आनंदा आंबवले यांसह लाभार्थी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलत्या काळात बेरोजगारांची संख्या वाढत असून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी 109 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याचे सांगून त्यांनी मुलाखतींसाठी स्टॉल उभारले असल्याची माहिती आमदार थोपटे यांनी दिली. या मेळाव्याच्या नियोजनाची माहिती स्वरूपा थोपटे यांनी दिली. यावेळी विविध कपन्यांतर्फे 2 हजार 567 बेरोजगारांच्या मुलाखती घेऊन 980 सुशिक्षित उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
शिंगवे येथे दुसऱ्यांदा आढळला “पोवळा’
पारगाव शिंगवे, दि. 8 (वार्ताहर) -शिंगवे (ता. आंबेगाव) येथे पोवळा जातीचा दुर्मिळ विषारी साप आढळला आहे. शिंगवे येथील रत्नाकर पांडुरंग वाव्हळ यांच्या घराच्या ओट्यावर हा साप दिसला. हा साप लहान आकाराचा असल्याने त्यांनी चिमट्याने अलगद प्लास्टिक बरणीत पकडून शिंगवे येथील निसर्ग अभ्यासक दत्तात्रय राजगुरव आणि शारदा राजगुरव यांना सापाची ओळख करून घेण्यासाठी दाखवण्यास घेऊन गेले असता तो साप पोवळा जातीचा दुर्मिळ विषारी साप असल्याचे त्यांनी सांगितले. हा साप पोवळा, काकसर्प या नावानेही ओळखला जातो.
हा साप अतिशय दुर्मिळ असून तो शिंगवे परिसरात दुसऱ्यांदा आढळल्याची नोंद आहे. हा साप मातकट खाकी रंगाचा असून पोटाखालील बाजूस लालसर गुलाबी रंगाचा असतो. तोंड काळ्या रंगाचे आणि शेपटी थोडी बोथट असते. शेपटीवर दोन काळे पट्टे असतात. हा साप पालापाचोळ्यात तीन ते सहा अंडी घालतो. साधारण पंधरा ते अठरा इंचापर्यंत वाढतो. या सापला डिवचल्यास शेपटीकडील भाग अंगठीसारखा गोल करून शेपटी खालील भगवा रंग दाखवून शत्रूचे लक्ष विचलित करून जीव वाचवतो. या सापाचे विष नाग, मण्यार या सापांच्या विषाप्रमाणे मनुष्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. थंडीच्या दिवसात याचा वावर दिसून येतो. या जातीचा साप नामशेष होण्याच्या मार्गावर असून याच्या चाव्यापासून भारतात मृत्यूची नोंद नाही.