पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) – हेअर ड्रायरने बाटलीचे झाकण उघडून बाटलीत बनावट मद्य भरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाने छापा मारून कारवाई करत 70 हजार 960 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मोशी येथे करण्यात आली.
सुरज राजू माने (वय 27, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे बीट क्रमांक एकच्या दुय्यम निरीक्षक स्वाती भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे एका चायनीज सेंटरमध्ये बनावट दारूची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार छापा मारून कारवाई करत बनावट देशी व विदेशी दारूच्या 51 बाटल्या असा एकूण चार हजार 230 रुपयांचा मुददेमाल जप्त केला.
सुरज माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोशी गाव आल्हाट वस्ती येथील इमारतीत बनावट देशी व विदेशी मद्याची निर्मिती करत असल्याचे त्याने सांगितले. मोशी येथील इमारतीत छापा मारून बनावट देशी दारुच्या 74 बाटल्या तसेच विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, मोबाईल, दाभण, एक दुचाकी असा एकूण 70 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनावट देशी मद्य बनवत असताना देशी दारुच्या बाटल्यांचे झाकण हेयर ड्रायर व दाभनाच्या साह्याने उघडून त्यात पाणी मिश्रित मद्य भरण्यात येत होते. बनावट विदेशी मद्य निर्मिती करत असताना स्वस्त असलेल्या मद्याचा वापर करण्यात येत होता. स्वस्त मद्य रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्याची नामांकित कंपनीचे मद्य म्हणून विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे.