पिंपरी – केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2023 साठी शहरी वाहतूक विभागांमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर काम केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
केंद्राच्या शहरी विकास मंत्रालयाने अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2023 साठी शहरी वाहतूक विभागांमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर काम करणाऱ्या महापालिका, मेट्रो कार्पोरेशन, बस कार्पोरेशन यांच्याकडून प्रवेशिका मागविल्या होत्या. त्यामध्ये संपूर्ण देशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेत विना वाहन वापर (एनएमटी) धोरणास व त्या अनुषंगाने महापालिकेने केलेल्या कामांचा समावेश करण्यात आला.
पिंपळे सौदागर, सांगवी-किवळे रस्ता व नाशिक-फाटा ते वाकड रस्त्यावरील सायकल मार्ग व पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविल्याची प्रवेशिका 25 ऑगस्ट 2023 रोजी शहरी विकास मंत्रालयाकडे सादर केली. त्यामध्ये भारतातील अनेक शहरांमधून पिंपरी-चिंचवड शहराची निवड करण्यात आली. यासंदर्भातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आज रविवारी (दि. 29) महापालिकेस घोषित करण्यात आले.
हे पारितोषिक शहरी विकास मंत्रालय भारत सरकारचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिल्ली येथील माणिक शॉ सेंटर येथे स्वीकारले. यावेळी आयुक्तांसह प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार, आयटीडीपीचे प्रांजल कुलकर्णी तसेच डिझाइन शाळाचे संचालक आशिक जैन उपस्थित होते.