पिंपरी – शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या आसपासचा परिसर, चौक या ठिकाणी रोडरोमियोंचा त्रास दिवसें-दिवस वाढतच चालला आहे. आपल्यावर कोणतीच कारवाई होत नाही हे पाहून या रोडरोमियांची हिम्मत वाढतच चालली आहे. यामुळे गंभीर गुन्ह्याची भीती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे या रोडरोमियोंवर कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा “फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. तसेच महाविद्यालय सुरू झाल्याने नवीन विद्यार्थी-विद्यार्थिनीही येतात. या फ्रेडशिप डेच्या निमित्ताने बाहेरील विद्यार्थीही चोरी-छुपे महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करतात. अशा विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. याशिवाय रोडरोमिओंकडून दररोज होणारा त्रास वेगळाच असतो.
मुलगी दिसली की तिच्याकडे एकटक पाहत राहणे, शिट्टी वाजविणे, विनाकारण आवाज देणे, तिच्या अगदी जवळून दुचाकी नेणे, तिचे लक्ष वेधण्यासाठी जोरात हॉर्न वाजविणे, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकी उभी करून तासन्तास गप्पा मारत बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एखादीने छेडछाडीचा जाब विचारण्यास भांडण करणे, विद्यार्थिनीच्या मागे-मागे जाणे, बसमध्ये बाजूच्या सीटवर किंवा मागच्या सीटवर बसून त्रास देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
घरापासूनच होतो पाठलाग
मुलींच्या मागे शाळेपर्यंत येणारे रोडरोमिओ हे परिसरातील असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विद्यार्थिनी घरातून निघाल्यापासून पाठलाग होतो. यामुळे काही पालकांनी स्कूलबसचा पर्याय निवडला. मात्र, शाळेच्या आवारातही रोडरोमिओ येतात. शिक्षकांनी हटकल्यास भावाला किंवा बहिणीला न्यायला आल्याचे सांगतात. रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आपली घरेही बदलली आहेत. कामाला जाणाऱ्या आई-वडिलांच्या पाल्यांची परिस्थिती तर आणखी बिकट असते.
आहेत कुठे पोलीस काका?
माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून पोलिकाका हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना पोलीस काकाचा मोबाइल नंबर दिला. मात्र त्यांची बदली होताच हा उपक्रम बंद पडला. आता तर शोधूनही पोलीसकाका सापडत नाही. तसेच दामिनी पथकही बासनात गुंडाळल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पोलिसांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक आश्चर्य आणि संताप व्यक्त करत आहेत.
बदनामी नको म्हणून….
अनेक शाळा आणि महाविद्यालयाच्या बाहेर रोडरोडरोमिओंचा तळ असतो. आपण तक्रार केल्यास आणि पोलिसांनी कारवाई केल्यास आपल्या संस्थेची बदनामी होईल, या भीतीने अनेक मुख्याध्यापक आणि प्राचार्य शांत राहतात.
शिक्षकांनाही दमदाटी
शाळा-महाविद्यालयाबाहेर रोडरोमिओंकडून त्रास दिला जातो. याबाबत एखाद्या शिक्षकाने जाब विचारलाच तर त्यांनाही दमदाटी करीत बघून घेण्याची भाषा केली जाते. अशा वेळी संस्थेकडूनही त्या शिक्षकाला पाठबळ देण्याऐवजी दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जातो.
संवादाची गरज
अनेक मुली शाळा-महाविद्यालयात होणाऱ्या त्रासाबाबत पालकांना सांगत नाहीत. तुला का त्रास देतात, इतर मुलींना का त्रास देत नाहीत, अशी प्रश्नांची सरबत्ती मुलीवर करून तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. कदाचित आपले शिक्षणही बंद करण्याची भीती विद्यार्थिनींना वाटते. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधण्याची गरज आहे. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची जाणीव तिला करून द्या.
मारा; पण गुन्हा नको
पोलीस काही वेळा रोडरोमिओवर कारवाई करतात. अशावेळी त्या रोडरोमिओंच्या पालकांना पोलिसांकडून बोलविण्यात येते. अशावेळी त्याला चांगला हाना, पण गुन्हा दाखल करू नका, अशी विनवणी पालकांकडून केली जाते. त्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून पोलिसही कठोर कारवाई करीत नाहीत.
उपाययोजना
महाविद्यालयाबाहेर रोडरोमिओवर नियमित कारवाई व्हावी
विद्यार्थिनीनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत तक्रार करावी
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर व आवारात सीसी कॅमेरे लावावेत
महाविद्यालयाच्या वेळेत प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी
ओळखपत्राशिवाय महाविद्यालयाच्या आवारात कोणालाही प्रवेश देऊ नये
रोडरोमिओंची माहिती लेखी स्वरूपात पोलीस ठाण्यांना कळवावी