पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दापोडी येथे आई उद्यान विकसित करण्यात आले आहे. या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना आपली शारीरिक क्षमता व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करता यावा म्हणून ओपन जिम सुरू करण्यात आली. परंतु उद्यानातील जिमच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी या उद्यानातील समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच दापोडी परिसरात बहुतांश नागरिक मध्यमवर्गीय कुटुंबात राहत आहेत. चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी आई उद्यानात नागरिक सकाळ व सायंकाळी येतात. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. परंतु दोन वर्षापासून उद्यानातील ओपन जिमची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना शारीरिक कसरती करण्यास अडचणी येत आहेत. ओपन जिमचे साहित्य ज्या ठेकेदाराने बसविले आहे ते दर्जेदार आहे की नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच दोन वर्षांपासून साहित्याची दुरुस्ती होत नसेल तर नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील बहुतांश उद्यानात ओपन जिम करण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच उद्यानातील ओपन जिमच्या साहित्याची दुरवस्था झाली आहे. बरेच साहित्य तुटून पडले आहे. त्यामुळे केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला होता का असा प्रश्न नागरिक करत आहेत. हा उपक्रम सुरू करताना या साहित्याच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेने कोणाला दिली आहे. दिले असेल तर ते साहित्य का दुरुस्त करत नाहीत अथवा नवीन टाकत नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे. का केवळ स्मार्ट सिटी करण्यासाठी कागदोपत्री घोडे नाचविण्यासाठी या योजना राबविल्या जात आहेत, असा आरोप नागरिक करत आहेत.
साहित्यांची मोडतोड
उद्यानात नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी महापालिकेच्या वतीने ओपन जिमचा प्रयोग करण्यात आला. यामुळे दापोडी परिसरातील अनेक लहान मुले, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला आई उद्यानात फिरण्यासाठी व शारीरिक कसरती करण्यासाठी येत आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाल्यामुळे नागरिकांना व्यायाम करताना अडचणी येत आहेत. या साहित्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्वच्छतागृहांना कुलूप
उद्यानात फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लघुशंका करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले आहेत. या स्वच्छतागृहांमुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची व महिलांची सोय होत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून उद्यानातील स्वच्छतागृह कुलूप लावून बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या लहान मुलांची, महिलांची तसेच ज्येष्ठांची मोठी कुचंबणा होत आहे. आम्ही लघुशंकेसाठी कुठे जायचे असा प्रश्न नागरिक करत आहेत. मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे.
नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध
आई उद्यानातील असुविधेमुळे दापोडी परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. उद्यानातील सोयीसुविधा त्वरित पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या वेळी गार्डन बेस्ट ग्रुपचे अध्यक्ष रणजीत गायकवाड, संभाजी शिंदे, बाबा घोगडे, शरद गायकवाड, दाऊद शेख, विठ्ठल अडसूळ, विलास यळवंडे, राजेंद्र सोनवणे, चंद्रकांत खोत, शाहू खरात, सतीश काबिया, संजय जोहरी, दिलीप म्हस्के, अस्मिता कांबळे व महिलांची विशेष उपस्थिती होती.