जाधववाडी – बोऱ्हाडेवाडी येथील शिवरोडवर बालाजी विश्व व के. के. कायझान सोसायटीसमोरील तसेच या रोडवरील पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना यामधून प्रवास करणे कठीण जात आहे. या रस्त्याची महापालिका प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
बोऱ्हाडेवाडी मोशी येथील 18 मीटर शिवरोडवर वूड्स विले फेज -1 सोसायटीपासून बालाजी विश्व सोसायटीपर्यंत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता आहे की पाण्याचे तळे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शहरात सातत्याने येणाऱ्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचून नागरिकांसह वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. बालाजी विश्व सोसायटी आणि के. के.कायझन सोसायटी समोर तर खूप मोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे येथून नागरिकांना विशेषतः महिला भगिनी, लहान मुले व वयोवृद्ध नागरिक यांना प्रवास करने कठीण जात आहे.
या रोडवर एक लहान मुलांची शाळा देखील आहे आणि या शाळेच्या समोरच हा मोठा खड्डा आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या लहान मुलांना व पालकांना याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे या 18 मीटर रोडवरील सर्व खड्डे बुजवून घेण्याच्या सूचना देऊनही काम होताना दिसत नाही. तरी महापालिका आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून येथील खड्डे त्वरित बुजून घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउंसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.
चिखली-मोशी भागातील बऱ्याच रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले आहेत. बोऱ्हाडेवाडी ते देहूरोडपर्यंत असणाऱ्या शिवरोडला तर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे. मागील वर्षीच आमच्या फेडरेशनच्या पाठपुराव्याने या रोडचे काम झालेले आहे. पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अशा ठेकेदाराला परत काम देताना पिंपरी चिंचवड महापालिकेने विचार करावा आणि नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.