पिंपरी – एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय, कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, “सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है” अशी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा पिंपरीत शनिवारी (दि.9) दुपारी धडकला.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी चौकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश काळे हे गुरूवार (दि.7) पासून उपोषणाला बसले आहेत.
या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख ऍड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मारुती भापकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र जगताप, अतूल शितोळे, माजी नगरसेविका सीमा सावळे, विनायक रणसुभे, काशिनाथ नखाते, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप,अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी येळकर-पाटील, प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे प्रविण कदम, जीवन बोऱ्हाडे, महिला बिग्रेडच्या सुनिता शिंदे, आदी सहभागी झाले होते. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर मुस्लिम समाजातील महिला देखील सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनाला आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, पालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह आदी नेतेमंडळी उपस्थित होती.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा समाजाच्या मोर्चा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.