पुणे – आचार्य आनंद ऋषी चौकातील (पुणे विद्यापीठ चौक) उड्डाणपुलाचे काम पीएमआरडीएकडून सुरू आहे. त्याअंतर्गत पाषाण तसेच औंध रस्त्याच्या बाजूने रॅम्पचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी विद्यापीठ चौक ते रिझर्व्ह बॅंकेपर्यंत (हरेकृष्ण पथाजवळ) उभारण्यात येणाऱ्या पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत.
मात्र, या जागांवर रस्ता करायचा असला, तरी जवळपास 198 झाडे बाधित होत आहेत. त्यामुळे त्यातील काही झाडे काढावी लागणार असून, काहींची पुनर्रोपण केले जाणार आहे. तर, काही झाडांच्या केवळ फांद्या काढण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. हिंजवडी मेट्रो मार्गासोबत हा पूल उभारला जात आहे. हा रस्ता दोन्ही बाजूंनी प्रत्येकी साडेचार मीटर रुंद केला जाणार असून त्यासाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका प्रशासनास 15 सप्टेंबर मुदत दिली आहे.
आता आयुक्तांना अधिकार
विकासकामांसाठी 200 पेक्षा अधिक झाडे तोडायची असल्यास त्याची परवानगी राज्यशासनाच्या राज्य वृक्ष प्राधिकरण समितीकडून घ्यावी लागत होती. मात्र,राज्य सरकारने त्यात सुधारणा केली असून आता हे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. प्रत्यक्षात विद्यापीठ रस्त्यावरील परवानगी आयुक्त देऊ शकत असले तरी शासनाच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे. ते मिळताच विद्यापीठ रस्ता तसेच नदीकाठ विकसन प्रकल्पातील झाडांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.