पिंपरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहांची दरवाढ कमी केली. ही दरवाढ कमी होताच व्यावसायिक नाट्यसंस्थांनी आधीच बुकींग केले आहे. त्यामुळे इतर संस्थांना प्रयोगासाठी नाट्यगृहेच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आम्ही प्रयोग करायचे की नाही, असा प्रश्न शहरातील कलाकार उपस्थित करत आहेत. तसेच नाट्यगृह मिळत नसल्याने कलाकारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे, नवी सांगवीतील निळू फुले नाट्यगृह, तर प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह अशी पाच नाट्यगृहे आहेत. महापालिकेच्या वतीने चारपट भाडेदरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील नाट्यसंस्था आणि कलाकारांचा तीव्र विरोध झाला होता. तसेच कलाकारांनी पुढाकार घेत दरवाढ मागे घेण्याची मागणी केल्यानंतर ५० टक्के दरवाढ मागे घेतली होती.
शहरात नुकतेच शंभरावे नाट्य संमेलन झाले. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच अभिनेते आणि मध्यवर्ती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भाडेवाढीबाबत उद्घाटनाच्या भाषणातच नाराजी व्यक्त केली होती. तसेच उपस्थितांनीही दरवाढीबाबत भाष्य केले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी दरवाढ मागे घेण्याचे आदेश पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना कार्यक्रमातच दिले. त्यानुसार आयुक्तांनी त्याच दिवशी पूर्वीप्रमाणे भाडेदर करण्याचे पत्र जाहीर केले. नाट्य दरवाढ कमी झाल्याने व्यावसायिक संस्थांकडून तारखांचे बुकिंग करण्यात आल्याचे कलाकार सांगत आहेत. त्यामुळे शहरातील इतर प्रायोगिक नाट्य संस्थांना तारखाच मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे. स्थानिक कलाकारांना नाट्यगृह उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे कलाकार सांगत आहेत.
प्रयोगासाठी आम्ही नाट्यगृहांची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नाट्यगृहच उपलब्ध नसेल तर आम्ही सराव कुठे करायचा, असा प्रश्न आहे. शहरातील स्थानिक संस्था, कलाकारांना नाट्यगृहे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
– युसूफ अली शेख, कलाकार.