बाजारात मोठ्या आकाराची बोरे
नगर – संक्रांत झाली की, हिवाळ्यात आंबट-गोड गावरान बोरांची भल्याभल्यांना आठवण येते. लहानमुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच या गावरान बोरांची भुरळ पडते. परंतु, गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची आठवण जराशी पुसट होत चालली आहे. पूर्वी शेताच्या बांधावर असणारी बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या बोरांची आवक होताना दिसत आहे.काही ठिकाणी संक्रांतीला देखील विदेशी बोरांना मागणी आहे.
विदेशी संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ भरली आहे. मात्र, गावरान बोरांची मजा आता काय राहिली नाही. गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते; पण बदलत्या काळाच्या ओघात ही बोरं पुसट होत चालली आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागासह शहरी भागातही गावरान बोरंच मिळत होती. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या जाती निर्माण झाल्या आहेत. पण यात गावरान बोरांची चव मात्र नाही.
पौष्टिकतेच्या बाबतीत बोरं सफरचंदापेक्षा श्रेष्ठ
मकर संक्रांतीच्या सणाला तर या बोरांना बाजारपेठेत खास मागणी असते. पौष्टिकतेच्या बाबतीत व आरोग्यासाठी बोरं सफरचंदापेक्षा श्रेष्ठ मानली जातात. वाणात ही ऊस, ढाळे, ओव्या यासोबत गावरान बोरांचा मान आहे. भोगीच्या जेवणात आहारातही या बोरांना विशेष महत्त्व आहे. ही गावरान बोरं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच बोरांमध्ये अ, क जीवनसत्त्व आदी औषधी गुणधर्म तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे धातू अधिक प्रमाणात आढळतात
थायलंडच्या अँपल बोरांचे भारतात प्रथम पश्चिम बंगाल राज्यात उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर देशाच्या सर्व भागात हे फळपीक घेतले जात आहे. फळ बाजारात विविध फळांबरोबरच आकर्षक अॅपल बोर विक्रीसाठी आहेत. परंतु अॅपल बोरला पुरेसा भाव नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ विक्रीत शंभर रुपयात अडीच किलो बोरं मिळत आहेत.
असीम शेख, विक्रेता