आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर – नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने माजी संचालकांविरूध्दचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांना पकडल्यावर सोमवार (दि.२९) रोजी पहाटे बँकेचे माजी संचालक अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर ) याला अटक केली.
या गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजी संचालकाडे मोर्चा वळविला आहे. फॉरेन्सिक ऑडिट नुसार हा एकूण २९२ कोटींचा घोटाळा असून, यामध्ये शंभरहून अधिक संशयीत आरोपी आहेत. यातील बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. तत्कालीन अध्यक्ष व संचालक संचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यातील काही आरोपी फरार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने मुंबईतील संस्थेकडून फॉरेन्सिक ऑडिट करून घेण्यात आले. त्यानंतर घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे, हेही स्पष्ट झालेले आहे. त्याआधारे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून, इतरही आरोपींना पोलिसांकडून लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज माजी अध्यक्ष कसोक कटारिया हा पळून जाण्याच्या तयारीत होता. कटारीया हे नगर अर्बन बँकेतील सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी परिवाराचे निकटवर्तीय आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला आळे फाटा येथून सोमवारी पहाटे ताब्यात घेत अटक केली.