पिंपरी – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने अचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर होणार असून तब्बल 800 कोटींची विकासकामे दीड महिन्यांहून अधिक काळ रखडणार आहेत. विकासकामांवर परिणाम नको अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याने निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक म्हणून कामकाज पहात आहेत. राज्यस्तरावर झालेल्या राजकीय बदलानंतर महापालिकेच्या वतीने सध्या मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुळा नदी सुधार योजना हा 340 कोटींचा प्रकल्प असून 140 कोटींचा पंतप्रधान आवास योजनेसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जॅकवेलसाठी 151 कोटींचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
या प्रमुख साडेसहाशे कोटींसह इतर 150 कोटींची कामे महापालिका स्तरावर हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे निविदास्तरावर अथवा स्थायीच्या मान्यतेपर्यंत पोहोचलेली आहेत. या कामांना अद्यापपर्यंत स्थायी समितीने मान्यता दिलेली नसल्यामुळे या सर्व कामांवर आचारसंहितेचा परिणाम होणार आहे. स्थायी समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्यामुळे ही सर्वच्या सर्व कामे रखडली जाण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. आज (दि. 18) निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडून विकासकामांना अडथळा नको अशी भूमिका घेत निवडणूक आयोगाकडे शिथील धोरण राबविण्याबाबत विनंती केल्याचे समजते. पोटनिवडणूक असलेल्या मतदारसंघामध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय अथवा मतदारांवर परिणाम करणारे निर्णय घेण्यास प्रतिबंध करावा मात्र, इतर मतदारसंघाच्या बाबतीत शिथिलक्षम धोरण असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार हे पुढील एक-दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीने मान्यता न दिलेली कामे रखडणार असली तरी मान्यता दिलेल्या कामांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोग त्याबाबतचे निश्चित परिपत्रक जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आचारसंहिता संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी?
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा आणि पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने तत्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे चिंचवड आणि कसबा या दोन्ही विधानसभा मतदार संघातील शासकीय कार्यक्रम, विकास कामांची उद्घाटनांना बंधने आली आहेत. मात्र, दोन्ही विधानसभा मतदार संघासाठी आचारसंहित न लागता संपूर्ण पुणे जिल्ह्याला आचारसंहित लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फक्त कसबा, चिंचवड वगळता इतर भागांना जास्त बंधने नसतील, अशी शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.