पिंपरी – उपनिबंधक सहकारी संस्था 3 अंतर्गत 62 सहकारी संस्था बोगस आढळल्या आहेत. या संस्थांनी नोंदणी करताना दिलेला पत्ताच सापडलेला नाही. केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खोटे पत्ते दिल्याचे कार्यालयाचे म्हणणे आहे. कार्यालयाने केलेल्या सर्व्हेक्षणात हे आढळून आले आहे. या संस्थांना कार्यालयाकडून अंतिम नोटीस पाठविण्यात आल्या असून या संस्थांची नोंदणी रद्द करून बंद करण्याची कारवाई कार्यालयाकडून केली जाणार आहे.
उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (3) कार्यालयांतर्गत 4 हजार 46 संस्था नोंदणीकृत संस्था कार्यरत असल्याची नोंद आहे. सहकारी संस्था स्थापन करायची असल्यास उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयांतर्गत त्याची नोंदणी केली जाते. दरवर्षी या संस्थांकडून नोंदणीचे नूतनीकरण केले जाते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, सभासदांची यादी जोडावी लागत आहे. या बरोबरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून तसा तपशील कार्यालयाला द्यावा लागतो. त्यानंतर निवडणुका होऊन पुन्हा नवीन कार्यकारिणी सहकारी संस्थांवर कार्यरत होते. ही किचकट प्रक्रिया सातत्याने करावी लागत असल्याने अनेक जण याकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.
या कार्यालयांतर्गत चिंचवड, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर आदीसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भागाचा समावेश होतो. यामध्ये औद्योगिक, मजूर, पतसंस्था, ग्राहकसह इतर संस्थांचा समावेश होतो. ज्या संस्थांनी नुतणीकरण केलेले नाही, अशा संस्थांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बोगस आढळलेल्या संस्थांची संख्या –
1) औद्योगिक – 10
2) मजूर – 2
3) पतसंस्था – 18
4) ग्राहक – 9
5) इतर – स्वयंरोजगार – 23
कार्यालयाकडून सर्व्हेक्षण केले आहे. यामध्ये काही संस्थांचे पत्तेच सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आम्ही अंतिम नोटीस पाठवली आहे. या संस्था बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. काही संस्थांनी स्वतःहून नोंदणी रद्द करावी, असे सांगितले आहे.
– पंकज राऊत, जनमाहिती अधिकारी, उपनिंबधक सहकारी संस्था (3)