पुणे – निवासी मिळकतींना 40 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय शासनस्तरावर होण्यासाठी उशीर झाला. त्यानंतरही मनपा मिळकतकर विभागास सवलतीत कर भरण्याच्या मुदतीत यंदा विक्रमी उत्पन्न 1283 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे 136 कोटींनी हे उत्पन्न अधिक आहे.
मागील वर्षी सवलतीच्या पहिल्या दोन महिन्यांच्या दोन महिन्यात 1,145 कोटींचा महसूल मिळाला होता. सुमारे 6 लाख मिळकतधारकांनी हा कर भरलेला असून एकूण मिळकतधारकांच्या 50 टक्केच करधारकांनी ही रक्कम भरलेली आहे. महापालिकेने यापूर्वी 31 जुलैपूर्वी सवलतीत कर भरण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, शेवटच्या दिवशी मिळकतकर विभागाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने महापालिकेने एक दिवस मुदतवाढ दिली.
मात्र, लगेच दि. 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने मनपा यंत्रणा दौऱ्याच्या कामात होती. त्यामुळे पालिकेने दि. 2 ऑगस्ट ही शेवटची मुदत दिली होती. मात्र, बुधवारी दिवसभर “सर्व्हर डाऊन’ असल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतरही नागरिकांनी कर भरण्यास रांगा लावल्या.
“मिळकतकराच्या उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 136 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सवलतीत कर भरण्याची मुदत संपलेली असली तरी, नागारिकांना नियमित कर भरता येणार आहे. मात्र, मुदतीत कर न भरलेल्या नागरिकांना पालिकेच्या बक्षिस योजनेचा लाभ मिळणार नाही” – अजित देशमुख, उपायुक्त, करसंकलन विभाग