पिंपरी– इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने थरमॅक्स चौक चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. या आगीतून आठ गेस्टसह १९ जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश आले.
थरमॅक्स चौकातील हॉटेल गोल्डन करी या चार मजली हॉटेलमध्ये तळमजल्यावर आग लागली. याबाबत अग्निशमन विभागास माहिती देण्यात आली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, प्राधिकरण उपकेंद्र आणि चिखली उपकेंद्र येथून तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.
हॉटेलच्या तळमजल्यामध्ये असलेल्या मीटर बॉक्समध्ये आग असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला ती आग नियंत्रणात आणली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर पाणी मारून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
आगीची घटना घडली त्यावेळी हॉटेलमध्ये ११ कर्मचारी आणि आठ गेस्ट होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यामध्ये हॉटेलचे मीटर बॉक्स, वायरिंग आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.