जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांच्या घिरट्या
मंचर – आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीचा कार्यकाल डिसेंबर महिन्यात संपत आहे. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचाही कार्यकाल संपला असून त्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या गेल्या असल्याने त्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वाढदिवस, दीपावली सण किंवा अनेक कारणांनिमित्त वाडी वस्तीवर जाऊन पुढील एक ते दोन महिन्यांत होणाऱ्या निवडणुकी संदर्भात नागरिकांशी चर्चा करून पुढील काळात वस्तीवरील असणाऱ्या सर्व समस्या सोडवू; परंतु होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्या, अशी मागणी इच्छुक उमेदवार वाडीवस्तीवरील नागरिकांकडे करीत आहे.
कितीतरी उमेदवारांनी आत्तापासूनच सोशल मीडियावर भावी ग्रामपंचायत सदस्य, भावी सरपंच, भावी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य अशा विविध पोस्ट टाकून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. सोशल मीडियाच्या व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी अकाउंटच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
प्रशासनाने सुद्धा कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.