कार्ला, दि. 6 (वार्ताहर) -दिपावलीच्या सुट्टया आता संपत आल्या असून शनिवार व रविवार विकेंडमुळे कार्ला परिसरातील विविध पर्यटनस्थळे व एकवीरादेवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांनमुळे परिसरात गर्दी झाली होती. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली होती.
कार्ला परिसरात आई एकवीरा देवी, ऐतिहासिक कार्ला व भाजे येथील बुद्ध लेण्या, लोहगड, विसापूर किल्ले, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ केंद्र तसेच बंगल्यांमध्ये सुट्यांचा आनंद घेताना पर्यटक दिसत होते. पर्यटनाबरोबर कार्ल्याच्या आई एकवीरादेवीचे दर्शन घेण्यासाठी रविवार असल्याने कोळी, आग्री बांधवानी एकवीरादेवी मंदिर परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे कार्ला- वेहरगाव रोडवर वाहतूक कोंडी होत असून रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र पार्किंगसाठी जागा व पर्यायी मार्ग उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
दर शनिवारी, रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होत असून, वाहतूक कोंडीच्या समस्येला वेहरगाव दहिवली गावातील नागरिकांना देखील तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकाना घराबाहेर या वाहतुक कोंडीमुळे बाहेर पडता येत नाही.
कार्ला वेहरगाव रोडवरील ही कोंडी सोडवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक निलेश माने व पोलीस कर्मचारी प्रयत्न करत होते.