पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांना त्यांचे नातू रोहित पवार भक्कम साथ देत आहेत. त्याचवेळी राजकारणापासून अलिप्त असलेले पार्थ पवार यांचीही चर्चा होऊ लागली होती. त्यात बुधवारी पार्थ, जय पवार हे अजित पवार यांच्यासोबत दिसून आले.
वडील अजित पवार यांना या बंडात पार्थ हे पडद्यामागे होते, तर जय पवार हे अजितदादांच्या सातत्याने बरोबर असल्याचे तसेच भाषणावेळी ते पाठिशी उभे होते. त्यामुळे आगामी काळातील राजकारणात पवार यांचे नातू आमने-सामने असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवार आणि वाय. बी. सेंटरमध्ये शरद पवार गटाची बैठक झाली. शरद पवार यांच्या सोबत सुरूवातीपासूनच आमदार रोहित पवार हे आत्मविश्वासाने वावरत आहेत. सुप्रिया सुळे यांच्यानंतर तेच पवार यांना सोबत देत आहेत.
आज रोहित पवार यांचा वावर बैठकीत दिसून आला. त्याचवेळी अजित पवार यांच्या सभेत जय पवार हे आपल्या वडिलांच्या मागे उभे असल्याचे दिसून आले. तर, पार्थ पवार हे बैठकस्थळी सोफ्यावर बसून आमदांशी बोलताना पाहिले गेले तसेच वडिल अजित पवार यांचे संपूर्ण भाषण त्यांनी समोर बसून ऐकले.
पडद्यामागील भूमिका…
प्रसार माध्यमांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अजित पवार यांनी केलेल्या बंडातील काही गोपनीय कामे पार्थ पवार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. राजकीय गणिते जुळवून आणली जात असताना स्वतः पार्थ पवार हे भाजपसह अन्य नेत्यांशी चर्चा करीत होते. अजित पवार यांचे निरोप अन्य नेत्यांपर्यंत पोहोचविचेही काम त्यांनी केले.
पार्थ यांना कोणता मतदारसंघ?
लोकसभेच्या काही जागा तसेच विधानसभेच्या 90 जागा लढविणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यामध्ये पार्थ किंवा जय यांच्यासाठी कोणत्या मतदारसंघातील जागा असणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पार्थ यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. ही जागा आता शिवसेनेकडे आहे. त्यामुळे पार्थ यांना कोणता मतदारसंघ दिला जाणार का? अशीही चर्चा आहे.