भाजपसमोर उमेदवार देण्याचे विरोधकांपुढे आव्हान

जळगाव शहर 13

जळगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना तोडीसतोड उमेदवार शोधण्याचे विरोधकांपुढे आव्हान आहे. भाजपमध्येही अनेक इच्छुक असले, तरी आमदार भोळे हे जलसंपदा मंत्री तथा “संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या जवळचे समजले जातात.

जळगाव शहर मतदारसंघ म्हटलं, म्हणजे सुरेश जैन हेच समीकरण गेल्या 25 वर्षांपासून होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत निकालामुळे ते आता बदलले आहे. त्यावेळी युती न झाल्याने भाजप-शिवसेना आमनेसामने ठाकले होते. त्यात भाजपचे सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे हे जैन यांचा पराभव करून “जायंट किलर’ ठरले. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनी जळगावचा आमदार बदलला अन्‌ राजकारणानेही वळण घेतले. दरम्यान, यंदा सुरेश जैन विधानसभा लढवतील या शक्‍यतेने ही जागा पुन्हा शिवसेनेला देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. मात्र, “घरकुल’ प्रकरणाच्या निकालानंतर जैन यांच्या उमेदवारीवरील दावाच संपुष्टात आला आहे.

तर, विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर विरुध्द गुलाबराव पाटील यांच्यात काट्याची लढत ही ठरलेली असायची. 2014 च्या निवडणुकीवेळी देवकर हे घरकुल गैरव्यवहाराच्या आरोपामुळे कारागृहात असतांना शिवसेनेने जळगाव ग्रामीणची जागा सहज जिंकली. पण, यंदा मात्र देवकर यांच्या तुरुंगवासामुळे ही काट्याची लढत दिसणार नाही. त्यामुळे तेथे कोण उमेदवार असणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कॉंग्रेस क्षीण
आघाडीत जळगाव शहरची जागा कॉंग्रेसकडे आहे. मात्र, शहरातील जातीय गणितांची जुळवाजुळव करताना पक्ष एखादा नवीन उमेदवारही देणार का?. शहरात कॉंग्रेसची ताकद अत्यंत क्षीण आहे. अशा स्थितीत भाजपच्या संघटनात्मक बांधणीसमोर टिकण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे.

“ती’ चर्चा खरी, की वावड्या ठरणार…
1985 पासून सुरेश जैन यांचे जळगाव पालिकेवर वर्चस्व होते. 2019 पर्यंत त्याला कोणीही हादरा देऊ शकले नाही. तब्बल 35 वर्षे वर्चस्व असलेल्या महापालिकेवर आता भाजपने वर्चस्व मिळविले आहे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तब्बल 57 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे आता जळगाव शहर विधानसभेतून स्वत: गिरीश महाजन अन्‌ त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी साधना महाजन या लढणार असल्याची चर्चा सध्या जळगाव व जामनेर मतदारसंघात आहे. त्यामुळे ही चर्चा खरी ठरणार., की केवळ वावड्या? हे तिकीट जाहीर झाल्यावर समजेल.

Leave A Reply

Your email address will not be published.