“होमपिच’वरच चव्हाण कुटुंबाची कसोटी

भोकर जि. नांदेड (85)


दोन वेळा मुख्यमंत्री; तरीही विकास नाही

शंकरराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोकर विधानसभा मतदारसंघ नेहमीच मदत करत आला आहे. 2009मध्ये अशोक चव्हाण यांनी 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त मते घेतली. तर, 2014मध्ये अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण येथून जिंकल्या, पण त्यांचे मताधिक्‍य 20 हजारांनी घटले. या दरम्यान अशोक चव्हाण खासदारही होते. त्यामुळे भोकर मतदारसंघाचा काही तरी विकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मतदारांचा पुरता भ्रमनिरास झाला. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही “वजनदार’ नेत्यांनी भाजप नेत्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे यंदा चव्हाणांच्या दृष्टीने ही निवडणूक आव्हानात्मक राहण्याची चिन्हे आहेत. त्यावर स्वतः अशोक चव्हाण हेच येथून “बॅटिंग’ करण्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारा, कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणि चव्हाण कुटुंबीयांच्या हक्काचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून भोकरची ओळख आहे. मात्र, जनतेची नाराजी वाढली असून राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुदखेड, अर्धापूर आणि भोकर या तीन तालुक्‍यांचा मिळून हा मतदारसंघ आहे. 1967 ते आजपर्यंतच्या 11 निवडणुकांपैकी 5 वेळा येथे चव्हाण कुटुंबीयांना आमदारकी मिळाली. येथे जातीचा मुद्दा सर्वांत प्रभावी मानला जातो. दोन्ही उमेदवार जर एकाच समाजाचे असतील, तर पोटजातींपर्यंत हा मुद्दा पुढे सरकतो. या समीकरणात येथे पाटील-देशमुख यांचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत हाच मुद्दा निर्णायक ठरला आणि चव्हाणांना फक्‍त 4 हजार 900 मतांची आघाडी मिळाली. आता हाच मुद्दा पुढे करून स्थानिक नेतृत्त्वाला भाजपकडून फुंकर घातली जात आहे. तसे पाहिले, तर हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. पण, उमेदवार कोणीही असला तरी शिवसेनेला 15 ते 20 हजार मतांच्या पुढे जाता आलेले नाही. त्यामुळे चव्हाणांचा पराभव करणारे खासदार प्रतापराव चिखलीकर मैदानात उतरले असून ते भोकरमधून तगडा उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याबदल्यात शिवसेनेना हिंगोली जिल्ह्यातील एखादा मतदारसंघ सोडण्याची तयारी सुरू आहे.

नागरिकांची नाराजी काय?
– राज्याला दोन वेळा मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ असूनही बेरोजगारी अधिक.
– शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असूनही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेती पूर्णत: कोरडवाहू.
– भोकर शहरात आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो.
– मोठा आणि वजनदार तालुका असूनही फक्‍त एकच वरिष्ठ महाविद्यालय. उच्च शिक्षणाची अन्य सुविधा नाही.
– अशोक चव्हाण उद्योगमंत्री, मुख्यमंत्री होते. पण, एमआयडीसी क्षेत्रात एकही उद्योग नाही.
– मुख्य राज्यमार्गाची अक्षरश: चाळण झाली असून नागरिक वैतागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.