नगर – प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर ऑनलाइन प्रशिक्षणाचा धडाका सुरू आहे. मोदी एक आपत्ती या विषयावरती महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रशिक्षण विभागाच्या वतीने कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस आणि जिल्हा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत ऑनलाइन धडे गिरवले आहेत.
ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमास अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव वामशी रेड्डी त्याचबरोबर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, प्रदेश कॉंग्रेसचे आसिफ मुल्ला, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहर आणि जिल्हा कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अमर खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मोदी एक आपत्ती हा विषय घेऊन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लोकांमध्ये जात कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जागृती करणार आहेत. मोदी सत्तेत आल्यापासून या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली. युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोट्यावधी हातांचे काम गेले. जीएसटी सारख्या कुचकामी कर प्रणालीमुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले, या स्थितीला मोदी जबाबदार आहेत अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना सर्वंकष माहिती देत प्रशिक्षित करण्यात आले.
पक्षाच्या 278 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.