नगर -करोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची जिल्हा परिषद प्रशासन प्रभावी अंमबजावणी करीत असून ग्रामपंचायतपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम करोना समितीमुळे परजिल्हा, परराज्यासह परदेशातून आलेल्या 1 लाख 41 जणांची माहिती उपलब्ध झाली असून या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी दिली.
घुले यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे व वैद्यकीय अधिकारी हे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना सहकार्य करीत आहेत.
गावपातळीवर अंगणवाडी सेविका व आशा यांनी प्रत्येक कुटुंबात जावून करोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जनजागृती केली आहे. समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगाना ग्रामपंचायतीकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट, सॉनिटायझर किंवा रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली आहे. ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांकडून ग्रावापातळीवर स्वच्छता व निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात आली आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली.