कर्जत -दीड महिन्यापूर्वी झालेल्या हाणामारीचा राग मनात धरून रविवारी (दि.24) सकाळी आठ वाजता तालुक्यातील खांडवी येथे अकरा जणांनी मिळून चौघांना जबर मारहाण केली होती. त्यात दोघे जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू होते. काल दुपारी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा
दाखल केला असून, सर्व आरोपी फरार आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, 24 मे रोजी खांडवी येथील काकासाहेब मच्छिंद्र तापकीर (वय 31) व त्यांचे लहान बंधू धनंजय मच्छिंद्र तापकीर (वय 25), पल्लवी धनंजय तापकीर व प्रतीक्षा काकासाहेब तापकीर हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घोगरगावकडे चालले होते. वाकणवाडीजवळ येताच प्रवीण पोपट तापकीर आणि रोहित राघू तापकीर यांनी त्यांच्या गाडीला मोटारसायकल आडवी घालून अडविले. काकासाहेब व धनंजय यांना खाली ओढून मारहाण सुरू केली. त्यावेळी प्रतीक्षा आणि पल्लवी तापकीर या त्यांना सोडविण्यासाठी पुढे आल्या.
मात्र पोपट दगडू तापकीर, किरण पोपट तापकीर, मोहन दगडू तापकीर, राघू दगडू तापकीर, संकेत राघू तापकीर, शुभम रघुनाथ तापकीर, दिलीप एकनाथ तापकीर, प्रवीण दिलीप तापकीर व संदीप मोहन तापकीर यांनी हत्याराने चौघांना जबर मारहाण केली. त्यावेळी काकासाहेब तापकीर हे जागेवरच कोसळले. त्यांना उपचारासाठी नगरला नेण्यात आले. मात्र सोमवारी (दि.25) दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी धनंजय तापकीर हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या वरील अकरा आरोपींच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व आरोपी फरार असून, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड अधिक तपास करीत आहेत.