रेल्वेतील विलगीकरण कक्षातील बोगींचे पुन्हा होणार रुपांतर
– कल्याणी फडके
पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खाटा कमी पडू नयेत, यासाठी रेल्वेने देशभरात हजारो बोगींचे (कोचेस) विलगीकरण कक्षात रुपांतर केले. मात्र, आता श्रमिक विशेष गाड्यांमध्ये बोगी कमी पडू नयेत, यासाठी कक्षांचे रुपांतर पुन्हा साध्या बोगींमध्ये होणार आहे.
करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यास पर्यायी व्यवस्था असावी, यासाठी रेल्वे बोर्डाने बोगीमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध विभागांमध्ये कामदेखील सुरू झाले. मात्र, आता श्रमिक विशेष गाड्यांसाठी बोगी (कोचेस) कमी पडत आहेत. यामुळे पुन्हा विलगीकरण कक्षाचे रुपांतर साध्या बोगीमध्ये करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येत्या काळात आवश्यकता भासल्यास हे कोचेस श्रमिक विशेष गाड्यांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
मध्य रेल्वेमध्ये 482 बोगींचे रुपांतर विलगीकरण कक्षात केले. मात्र, नुकत्याच जाहीर आदेशानुसार, 50 टक्के बोगींचे रुपांतर प्रवासी बोगीमध्ये होणार असून, यानुसार पुणे विभागामध्ये तयार 60 पैकी 30 बोगींचे रुपांतर आवश्यकता भासल्यास होणार आहे. उर्वरित 50 टक्के बोगी मागणीनुसार, कोव्हिड केअर केंद्र म्हणून प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
असे आहेत रेल्वेतील विलगीकरण कक्ष
एसी नसणाऱ्या “स्लीपर’ बोगीच्या रचनेमध्ये बदल करण्यात येत आहेत. तेथील बर्थ काढले आहेत. विलगीकरण कक्षामध्ये रुग्णालयांप्रमाणे सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शिवाय, खाटा, पडदे, स्वच्छतागृहांसह ऑक्सिजनसाठी ठराविक जागेची व्यवस्था होती.
सध्या पुणे विभागाकडे पुरेशा गाड्या आहेत. आवश्यकता भासल्यास “आयसोलेशन वॉर्ड’चे रुपांतर करून त्याचा वापर श्रमिक विशेष गाड्यांसाठी होणार आहे. हे तात्पुरते बदल असून, श्रमिक गाड्यांसाठी बोगी कमी पडल्यास याबाबतचे काम होईल.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग