रेड झोन मात्र बंदच
पुणे – प्रवाशांसाठी नियमावली तयार करून एसटीची जिल्हांतर्गत सेवा लवकरच सुरू करण्याबाबतचा महामंडळ विचाराधीन आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय अपेक्षित असून यामुळे महामंडळाचे आर्थिक चक्र सुरू होण्यास मदत होईल.
सध्या एसटीची नियमित सेवा कुठेही सुरू नाही. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. तसेच कामगार, मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठीही एसटीचा वापर केला जात आहे.
मध्यंतरी राज्यांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला. परंतु, तो त्वरित मागे घेण्यात आला. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत, त्यात रेड झोन आणि उर्वरित अशा दोन क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये रेड झोन वगळता उर्वरित क्षेत्रांत सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नवीन आदेश लवकरच लागू होणार असल्याने एसटी महामंडळानेही सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.
एस.टीतील सूत्रानुसार मुंबई ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद हे सध्या तरी रेड झोनमध्ये आहेत त्यामुळे या भागात एस.टीची सेवा सुरू होणार नाही. उर्वरित क्षेत्रांतील परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हांतर्गत एस.टीची सेवा सुरू केली जाईल. सेवा सुरू झाली तरी प्रवाशांना प्रवासादरम्यान काही नियम पाळावे लागतील यात प्रत्येक आसनावर एकच प्रवासी घेण्यात येईल उभ्याने प्रवास करता येणार नाही प्रवांना मास्क घालणे बंधनकारक असेल, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 14 वर्षाखालील मुलांना प्रवास करता येणार नाही. या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशाप्रकारे करावी याबाबतचा आराखड्याचे काम सुरू आहे.