सिंधुदुर्ग – संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कणकवली न्यायालयातच जामीनाचा अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी न्यायालयात हजर केले गेले. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ही सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर पार पडली. या सुनावणीनंतर आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमदार नितेश राणेंना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले. तसेच नितेश राणेंना गोव्यातील त्यांच्या हॉटेलवर घेऊन चौकशी केली असता त्यांचा सीडीआर रिपोर्ट आणि नितेश राणे, राकेश परब याचे तिथे झालेल्या संभाषणाची चौकशी पोलिसांनी केली आहे. त्यातून त्यांना काही माहिती मिळाली आहे. मात्र अजून चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे, अस सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला.
दरम्यान नितेश राणे यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहाऐवजी रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशा मागणीचा अर्ज नितेश राणे यांच्या वकिलांनी तुरुंग अधीक्षकांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे.