पुणे – कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात शिवाजीनगर येथील न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल झाला आहे. सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बोलताना महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा खटला दाखल करून घेतला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कराडकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खटल्याद्वारे करण्यात आली आहे. ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार आणि ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा खटला दाखल केला आहे.
कराडकर यांनी जाणीवपूर्वक कोणताही पुरावा नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सातारा येथे वाइन विक्री निर्णयाविरोधात आंदोलन करताना कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
तसेच खासदार सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात. तसेच ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला, अशी मराठीत म्हण आहे. उद्धव ठाकरे यांना अजित पवारांचा गुण लागल्याने सरकारने दारू विक्रीचा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली होती, असे याबाबत दाखल असलेल्या खटल्यात नमूद आहे.