पुणे- वेळेत काम न करणाऱ्या लालफितीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे “रिंगमास्टर’च. एका साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाच्या संदर्भात काम रोखून ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्याला अजित पवार यांच्या “दादागिरी’चा आसुड सहन करावा लागला. स्वत: अजित पवार आणि त्या खात्याच्या प्रधान सचिव यांनी सांगूनसुद्धा त्या अधिकाऱ्याने काम करण्यास चालढकल केली. यावर पवार यांनी त्या अधिकाऱ्याला फोन लावला असता अधिकाऱ्यांनी कामे होत नसल्याचे खापर शासनावर फोडले. यावर पवार यांनी “अरे सरकार म्हणजे अजित पवारच ना’. या शब्दात सुनावले. अजून कोणी सांगायला पाहिजे. ते काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
साखर संकुल येथे साखर कारखान्यांच्या बैठक आटोपून पवार बाहेर पडत असताना एका साखर कारखान्याच्या संचालकांनी पवार यांची भेट घेऊन डिस्टलरीची मान्यता देण्याचे काम अजून झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर पवार यांनी थेट उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून मी सांगूनसुद्धा काम का झाले नाही, असे विचारले असता अधिकाऱ्याने याचे अपयश शासनावर ढकले. यावर पवार यांनी मी सांगितले, प्रधान सचिवांनी सांगितले. अरे सरकार म्हणजे अजित पवारच ना, अजून कोणी सांगायला पाहिजे, सोमवारी मंत्रालयातील अधिकारी तुम्हाला फोन करतील. ते काम झाले पाहिजे. अशा शब्दात संबंधित अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले.
अजित पवार यांचा प्रशासनामध्ये दरारा
स्पष्टपणा आणि परखडपणे मत मांडणाऱ्या या स्वभावामुळे अजित पवार यांचा प्रशासनामध्ये दरारा आहे. अनेक प्रश्न मार्गी लावण्यात अजित पवार यांचा हातखंडा आहे. तसेच कोणताही निर्णय घेताना प्रशासनाला विश्वासात घेऊन विषय तडीस नेतात, मात्र अधिकारीच जर कामचुकारपणा करत असेल तर त्याची हयगयसुद्धा अजित पवार करत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा साखर संकुल येथे शनिवारी अनुभवायास मिळाली.