बीजिंग, तैपेई – चीनच्या सैन्याने आजपासून तैवानच्या भोवताली दोन दिवसांचा युद्धसराव सुरू केला. तैवानमध्ये नवीन अध्यक्ष लाय चिंग ते यांचा शपथविधी दोनच दिवसांपूर्वी झाला. तैवान हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा फार पूर्वीपासूनचा दावा त्यानंतर लाय यांनी शपथविधी नंतर लगेचच फेटाळून लावला आहे. त्यामुळे शिक्षा म्हणून चीनने हा युद्धसराव सुरू केला आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पूर्व विभागाने आज सकाळी ७.४५ वाजल्यापासून हा संयुक्त युद्धसराव सुरू केला आहे, असे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तैवानच्या स्वातंत्र्यासाठी फुटिरतावादी कारवायां करणाऱ्या गटांना शिक्षा आणि हस्तक्षेप, चिथावणी देणाऱ्या परकीय शक्तींना कठोर इशारा म्हणून हा युद्धसराव सुरू केला गेला असल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पूर्व विभागाचे प्रवक्ते ली शी यांनी सांगितले.
तैवान सामुद्रधुनी, तैवान बेटाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला तसेच किनमेन, मात्सू, वुकीउ आणि डोंगयिन या बेटांच्या आसपासच्या भागात हा युद्धसराव केला जात आहे. तैवानमधील सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेते आणि माजी अध्यक्षा त्साई इंग वेन यांचे उत्तराधिकारी असलेल्या लाय यांनी तैवानच्या अध्यक्षपदासाठी जानेवारीत झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. सोमवारी राजधानी तैपेईमध्ये झालेल्या समारंभात त्यांचा अध्यक्षपदाचा शपथविधी झाला आहे.