chhattisgarh – छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी आणि जवानांमध्ये भीषण चकमक झाली असून नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा सीमेवरील नक्षलग्रस्त भागात जवानांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी तीन जिल्ह्यांतील 1000 जवान शोध मोहिमेवर गेले होते. या काळात नक्षलवादी आणि जवानांमध्ये वेगवेगळ्या भागात चकमक झाली. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
माहिती देताना नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार म्हणाले की, नारायणपूर-विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्लाटून क्रमांक 16 आणि इंद्रावती एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांच्या गुप्त माहितीवरून, नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्याच्या डीआरजी आणि बस्तर फायटरसह एसटीएफच्या पथकांनी शोध मोहिमेवर निघाले होते.
आज सकाळी (23 मे) 11 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला होता. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. जवानांनी घटनास्थळावरून आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला आहे. 10/12 नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे.