Devendra Fadnavis Road Show – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आटोपताच दिल्लीकडे कूच करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. दिल्लीतील चांदणी चौक आणि उत्तर—पूर्व दिल्ली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांसाठी रोड शो सुध्दा केला. (Devendra Fadnavis’ ‘Road Show’ at Delhi’s Chandni Chowk)
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता थांबला. शेवटच्या दिवशी भाजपने आज आपली पूर्ण ताकद प्रचारात झोकून दिली. केंद्रीय मत्री स्मृती इराणी आणि देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आव्हान केले.
देवेंद्र फडणवीस कालपासून दिल्लीत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक संपल्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीकडे कूच केली. चांदणी चौकातील भाजपचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी त्यांनी काल रोड शो केला होता. तर उत्तर पूर्व दिल्लीतील उमेदवार मनोज तिवारी यांच्यासाठी आज रोड शो केला. देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोमध्ये स्थानिक लोकांची गर्दी उसळली होती.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. येथे काँग्रेसने जेपी अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी रोड शो केला. या जागेवरून काँग्रेसने कन्हैया कुमारला उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी दिल्लीतील सातही जागांवर मतदान होणार आहे.