FIH Men’s Hockey Pro League 2023/24 : भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच (FIH) प्रो लीग 2023-24 हंगामाच्या युरोपियन लेगला विजयासह सुरुवात केली आहे. बेल्जियममधील अँटवर्प येथे बुधवारी झालेली अर्जेंटिनाविरुद्धची लढत निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरीत राहिल्यानंतर भारताने शूटआऊटमध्ये पीआर श्रीजेशच्या शानदार बचावाच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाचा शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला.
अँटवर्पमध्ये खेळताना जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाने त्यांच्यापेक्षा एक स्थान वर असलेल्या भारताला कडवी झुंज दिली. सामन्याच्या निर्धारित वेळेत भारतीय पुरुष हॉकी संघाकडून मनदीप सिंग (11व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (55व्या मिनिटाला) यांनी गोल केले. त्याचवेळी, मार्टिनेझ लुकास (20 व्या मिनिटाला), डॉमिनिक टॉमस (60 व्या मिनिटाला) यांनी अर्जेंटिनासाठी गोल केले.
Full-time whistle blows of a thrilling match! 🏑
INDIA 🇮🇳 2 – 2 ARGENTINA 🇦🇷
(5 – 4 SO)India Claim 2 points with a nail-biting shootout victory bonus, while Argentina secure a point for a hard-fought draw at regulation time.
Goal Scorers:
11′ Mandeep Singh
55′ Lalit Kumar… pic.twitter.com/ZFxb7T83sd— Hockey India (@TheHockeyIndia) May 22, 2024
शूटआऊट जिंकून बोनस पॉइंट मिळवून, प्रशिक्षक क्रेग फुल्टनची टीम इंडिया FIH प्रो लीग टेबलमध्ये 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. शूटआऊटमध्ये भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन तर अभिषेकने एक गोल केला. तर अर्जेंटिनासाठी माइको कैसेलाने 2 तर जोआकिन आणि टोबिआस मार्टिन्स यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
जुलैमध्ये सुरू होणाऱ्या पॅरिस 2024 ऑलिम्पिक मोहिमेपूर्वी लय मिळवण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघ शुक्रवारी त्यांच्या FIH प्रो लीग मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात बेल्जियमशी भिडणार आहे.