नातेवाइकांनी आभार मानत सोडला सुटकेचा निःश्वास
इंद्रायणीनगर – युक्रेनच्या युद्ध भुमीमधून भोसरी विधानसभेतील विद्यार्थी-विद्यार्थिंनी सुखरुप पोचल्या आहेत. युक्रेनमधून भारतात येण्यासाठी युक्रेनियन नागरिकांनी चांगल्या प्रकारे मदत केल्याचेही त्या सांगतात. युद्धामुळे शिक्षण अपूर्ण राहिल्याचे दुःखही त्यांना आहे. मात्र, युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याचेही ते सांगतात.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील चैतन्य पार्कमध्ये राहणारी जान्हवी गणपत सांडभोर युक्रेनवरून भोसरीत पोचली. ती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये युक्रेनला एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेली होती. युद्धभूमिपासून सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चर्नेबोक्सीतील बुकामेनिया मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.
भारतात येण्यासाठी युक्रेनमधील नागरिकांनी मदत केल्याचे ती आवर्जून सांगते. रोमानिया सीमेवर आल्यावर तेथे इतर भागातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांची गर्दी होती. तेथून सीमा पार करण्यासाठी प्रत्येकालाच घाई होती. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला होता. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी जखमी अवस्थेतही होते. रोमानिया सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्याचेही जान्हवी सांगते.
पिंपरीतील मासुळकर कॉलनीत राहणाऱ्या सानिका किशोर महाजन ही एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात असणारी विद्यार्थिनी प्रत्यक्ष युद्धभूमी कीव्हमधून भारतात आली आहे. मात्र, भारतात येण्यासाठी संघर्ष करावा लागला. प्रत्यक्ष युद्ध भूमितच असल्याने तेथील विद्यार्थ्यांना अन्नपाण्यावाचून काही दिवस उपाशी राहावे लागले. युक्रेनमधील इंडियन अँबिसीद्वारे कुठल्याही प्रकारे भारतीय विद्यार्थ्यांना मदत मिळाली नाही, असे सानिका संतापाने सांगते.
भोसरी विधान सभेतील एकूण पंधरा विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते. हे सर्व सुखरुप घरी आले आहेत. विद्यार्थ्यांचे भाजपचे भोसरी विधानसभा सरचिटणिस विजय फुगे, नंदकुमार दाभाडे, दत्तात्रय फुगे आदींनी पेढे वाटून आणि त्यांच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले.
भोसरी परिसरातील 15 विद्यार्थी
नेत्रा दत्तात्रय बोराटे (चिखली), अभिषेक रमेश खर्डेकर (मोशी), ऋतुजा नितीन आल्हाट (चऱ्होली), अपूर्वा अविनाश मोहिते (शिवतेजनगर), ऋषीकेश विष्णू बकाळ (भोसरी), सानिका किशोर महाजन (मासूळकर कॉलनी), जान्हवी गणपत सांडभोर (भोसरी), गोविंद वनराज देवासी (मोशी), प्रज्ञा रुपेश पांडे (भोसरी), आशिष प्रदीप समुद्र (भोसरी), प्रितम संपत पोटघम (मोशी), वेदांत हनुमंत जाधव (भोसरी) हे सुखरूप घरी परतले आहेत. साक्षी सतिश बोराटे (मोशी) ही बुडापेस्टला तर विश्वंभर प्रकाश साकोरे (भोसरी) हा पोलंडला पोचले आहेत. ज्ञानेश विठ्ठल गाढवे (भोसरी) हा युक्रेनच्या सीमेवर सुरक्षित असून तोही भारतात येण्याच्या मार्गावर आहे.