World Cup 2023 NZ vs SL Match Results : विश्वचषकाच्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पाच विकेट राखून पराभव केला. स्पर्धेतील हा त्याचा पाचवा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. साखळी फेरीतील त्याचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून 10 गुण आहेत. त्यांनी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. न्यूझीलंडनेही श्रीलंकेला हरवून सलग चार सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली आहे.
किवी संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर मुंबईत भारताचा सामना होईल. आता अफगाणिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर पडला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे. न्यूझीलंडच्या श्रीलंकेवर मोठ्या विजयानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. बाबर आझमच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 287 धावांनी विजय मिळवावा लागेल. किंवा लक्ष्याचा पाठलाग केल्यास सामना 2.4 षटकांत संपवावा लागेल. हे करणे जवळजवळ अशक्य आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 23.1 षटकात 5 विकेट गमावत 172 धावा करत सामना जिंकला.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत डेव्हन कॉनवेने 45, डॅरिल मिशेलने 43 आणि रचिन रवींद्रने 42 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स 17 धावा करून नाबाद राहिला. केन विल्यमसनने 14 धावा केल्या. मार्क चॅपमन सात धावा करून बाद झाला. टॉम लॅथमने नाबाद 40 धावा केल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत अँजेलो मॅथ्यूजने दोन बळी घेतले. महिश तिक्ष्ण आणि दुष्मंथा चमेरा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
#CWC2023 #NZvSL : परेराचे अर्धशतक; श्रीलंकेनं न्यूझीलंडसमोर ठेवलं माफक लक्ष्य…
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 46.4 षटकांत सर्वबाद 171 धावांवर आटोपला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तीन धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली. निशांकाला आपले खातेही उघडता आले नाही. सौदीने त्याला बाद केलं. यानंतर परेराने वेगाने धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कर्णधार मेंडिस सहा धावा करून बाद झाला. समरविक्रमा एक धाव काढून बाद झाला तर चारिथ असलंकाने आठ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कुसल परेराही वैयक्तिक 51 धावांवर बाद झाला. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेची धावसंख्या 5 बाद 74 अशी झाली होती.
यानंतर धावांचा वेग कमी झाला, पण विकेट पडत राहिल्या. अँजेलो मॅथ्यूज 16 धावा करून बाद झाला तर धनंजय डी सिल्वा 19 धावा करून बाद झाला. चमिका करुणारत्नेही सहा धावा करून तर दुष्मंथा चमीराने एक धाव काढून बाद झाला. अखेरच्या विकेटसाठी महिष तिक्षीनाने दिलशान मदुशंकासोबत 43 धावांची भागीदारी केली आणि संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने 10 षटकात 37 धावा देताना सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.