पुणे(प्रतिनिधी) – कोंढव्यातील आईमाता मंदिरा लगतच्या मोकळ्या जागेत एका रखवालदाराचा निर्घुन खुन करण्यात आला. ही घटना भर दुपारी घडल्याने खळबळ माजली होती. तपासातील प्राथमिक माहितीनूसार पत्ते खेळताना वाद झाल्याने हा खुन झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर धाडण्यात आली आहेत.
प्रकाश खाजाप्पा खाणेकर (34, रा.मुळ दुधणी, अक्कलकोट, जि.सोलापूर) असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रकाश एका मोकळ्या प्लॉटमध्ये रखवालदाराचे काम करतो. दिवसा बिगारी काम करुन रात्री तेथे रखवालदारी करतो.
शनिवारी दुपारी तो काही ओळखीच्या लोकांसमवेत मोकळ्या प्लॉटमधील रहात्या शेडमध्ये पत्ते खेळत होता. यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी होऊन भांडणे झाली. भांडणाचे पर्यवसन खुनात झाले. येथे भांडणे सुरु असताना पोलिसांना नागरिकांनी कॉल केला होता. पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या कपाळावर खोल जखम झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक दांडके हस्तगत केले आहे.
प्रकाशला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या पासून वेगळी रहात होती. घटनास्थळी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर, डॉ.शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक घाडगे, पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी भेट दिली.