पुणे – पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी अकराच्या सुमारास ऐन वर्दळीच्या वेळी घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सलीम मेहबूब शेख(24) असे मृताचे तर तोहफिक शेख(27) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. हा खून पुर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी व मृत यांच्यामध्ये वाद होते. आज सकाळीही त्यांच्यात वाद झाले होते. यानंतर हा थरार घडला. मृत व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत.
अनेकदा ते मद्यपान करण्यास एकत्र बसत होते. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. सलीम व तोहफिक मुख्य रस्त्यापासून आतल्या रस्त्याकडे जात असताना आरोपी अचानक त्यांच्यामागून आला. त्याने दोघांनाही काही समजायच्या आतच पालघनसारख्या हत्याराने त्यांच्यावर वार केले.
हे वार वर्मी लागल्याने सलीमचा जागेवरच मृत्यू झाला तर तोहफिकला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे दाखल झाले होते.