पुणे(प्रतिनिधी) – मार्केट यार्डात विविध मागण्यांसाठी टेम्पो चालकांकडून येत्या बुधवारी (दि. 30) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत बाजार समिती प्रशासकांना श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड टेम्पो पंचायत, पुणेच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली.
मागील दोन महिन्यांपासून बाजार आवारातील वाहतुक व्यवस्था कोलमडलेली आहे. चालकांना गाड्यासह तासनतास प्रवेशद्वार क्रमांक 4 च्या बाहेर थांबावे लागत आहे. बाजार आवारातील सुरक्षा व्यवस्था कुचकामी झाली आहे. प्रवेशद्वार क्रमांक चार येथे खाली होणाऱ्या वटाणा, मिरची आणि बटाट्यांच्या गाड्यांकरिता नियोजन नाही. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.
सकाळी प्रवेशद्वार क्रमांक चार येथून भरलेल्या आणि रिकाम्या गाड्या सोडू नये, असे ठरले आहे. तरीही जाणीवपूर्वक गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडत आहे. 15 फुटांच्या बाहेर माल लावू नये, असे परिपत्रक असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. पंधराशे रुपये प्रमाणे चालकांकडून 40 लाखाहून अधिक रक्कम वसुल करण्यात आली आहे.
त्यास अनुसरून टेम्पोची संख्या मर्यादीत करणे, टेम्पो चालकास ओळखपत्र देणे, टेम्पो करीता पार्किंग सुविधा, प्रवेश पास आजपर्यंत देण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निरसण होत नाही. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संतोष नांगरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.