मुंबई – मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई शहर जिल्ह्याच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 240 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.
सन 2021-22 साठी मुंबई शहर जिल्हा नियोजन विभागाचा 180 कोटी रुपयांचा नियतव्यय होता. मात्र, सन 2022-23 करिता नियोजन विभागाने 124 कोटी 48 लाख 60 हजारांची मर्यादा मुंबई शहर जिल्ह्यासाठी दिली आहे.
मुंबई शहर जिल्ह्याच्या सुशोभिकरण व विकासकामांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 115 कोटी 51 लाख 40 हजार रुपयांच्या अतिरिक्त मागणीस या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अतिरिक्त मागणीसह 240 कोटी रुपयांच्या एकूण प्रारूप आराखड्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.