नारायणगाव – करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. करोना विषाणूचा ओमायक्रॉन हा आतापर्यंतचा सर्वाधिक भयंकर प्रकार असून याचा प्रसार वेगाने होऊ शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या रुग्णांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत.
नारायणगाव व वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील सात रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांची 12 डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी करून नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीचा अहवाल 17 डिसेंबर रोजी प्राप्त झाला. यातील सात रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्या सर्व रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे आरटीपीसीआर नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी येथे घेण्यात आले असून, तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे नारायणगाव, वारुळवाडी परिसरातील जनतेने अधिक सतर्क राहून करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी केले आहे.
ब्रिटनमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ
दरम्यान, ओमायक्रॉनने आतापर्यंत ९५ देशांमध्ये प्रवेश केला आहे. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा प्रसार पुन्हा एकदा झपाट्याने होताना दिसत असून यामागे ओमायक्रॉन असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ब्रिटनमध्ये बुधवारी (१५ डिसेंबर) ला ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते. ही एका दिवसात सापडलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. मात्र गुरुवारी येथे ८५ हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्येचा नवा विक्रम निर्माण झाला.
लशी प्रभावी ठरणार का?
करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारामध्ये स्पाईक प्रोटीन संदर्भात बदल झाल्याचे आढळून आले आहेत. बहुतांश लसी या स्पाईक प्रोटीनच्या आधारावरच काम करत असल्याने लसीकरण मोहीम ओमायक्रॉनपासून वाचवणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.