Hardik Pandya Stepbrother Arrested : आयपीएल 2024 च्या दरम्यान, क्रिकेटर हार्दिक पंड्याचा सावत्र भाऊ वैभव पंड्या याला बुधवारी त्याची आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या यांची व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय वैभव पंड्याने मुंबईतील भागीदारी फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांचा गंडा घातला, ज्यामुळे क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांचे नुकसान झाले.
थाटला आहे पॉलिमरचा व्यवसाय…
वास्तविक, हार्दिक पांड्या, त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि सावत्र भाऊ वैभव पंड्या ( Vaibhav Pandya ) यांच्या भागीदारीत पॉलिमर फर्म आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्याकडे 40 टक्के शेअर्स आहेत. तर, वैभव पांड्याकडे उर्वरित 20% शेअर्स आहेत. या तिन्ही भावांनी 2021 मध्ये पॉलिमरचा व्यवसाय सुरू केला होता. तिघांनी मिळून पॉलिमरचा व्यवसाय थाटला होता. भागीदारीच्या अटी अशा होत्या की, हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या प्रत्येकी 40% भांडवल गुंतवतील तर सावत्र भाऊ वैभव पंड्या 20% भांडवल गुंतवतील.
समोर आले आहे एक धक्कादायक प्रकरण
अटीनुसार फर्म चालवण्याची संपूर्ण जबाबदारी वैभव पंड्याची होती. पॉलिमर व्यवसायातून मिळणारा नफाही त्याच प्रमाणात विभागला जायचा. पण दरम्यान, वैभव पंड्याने भागीदारीच्या अटींचे उल्लंघन करून हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांच्या माहितीशिवाय दुसरी पॉलिमर फर्म सुरू केली. भागीदारीतील कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभव पांड्याने वेगळी कंपनी स्थापन केली. व तिथे सर्व नफा हस्तांतरित केला. यामुळे हार्दिक आणि कृणाल पांड्याला 4.3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
IPL 2024 : …तर ‘यशस्वी जैस्वाल’साठी T20 World Cup 2024 चा मार्ग होणार खडतर
3 कोटी रुपयांची घट…
माहितीनुसार, भागीदारी कंपनीच्या नफ्यात 3 कोटी रुपयांची घट झाली आहे. सावत्र भावाने त्यांच्या माहितीशिवाय त्याचा नफा 20% वरून 33.3% पर्यंत वाढवला. यामुळे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला एकूण 4.3 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. सावत्र भाऊ वैभव पंड्या याने भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटी रुपये त्याच्या स्वतंत्र फार्ममध्ये ट्रान्सफर केले. आता हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांच्या तक्रारीवरून त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्याला अटक करण्यात आली आहे.