IPL 2024 : …तर ‘यशस्वी जैस्वाल’साठी T20 World Cup 2024 चा मार्ग होणार खडतर

T20 World Cup 2024, Yashasvi Jaiswal : आगामी टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय क्रिकेट संघाची निवड लवकरच होणार आहे. या निवडीत आयपीएल 2024 मधील खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, आयपीएल 2024 च्या 24 क्रमांकाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. खराब फॉर्मशी झगडत असलेला यशस्वी जैस्वाल या सामन्यात चांगली कामगिरी करेल, अशी चाहत्यांना आशा होती, मात्र तसे झाले नाही.
यशस्वी जैस्वाल गुजरातविरुद्ध 24 धावा करून बाद झाला. उमेश यादवने त्याला यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. आतापर्यंतचा हा सीझन यशस्वीसाठी खूप वाईट गेला आहे. त्याने आपल्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये मिळून केवळ 63 धावा केल्या आहेत, त्यापैकी 24 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. या युवा फलंदाजाला आगामी विश्वचषकात आपले स्थान निश्चित करायचे असेल तर त्याला मोठी किंवा प्रभावी खेळी खेळावी लागणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच घोषणा केली होती की, रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल आणि अशा परिस्थितीत तोच सलामीवीर असेल. आता त्याचा जोडीदार कोण असेल हा प्रश्न आहे. या शर्यतीत अनेक स्पर्धक असले तरी सर्वात मोठी स्पर्धा गिल आणि जैस्वाल यांच्यात आहे, जे गेल्या वर्षभरापासून या क्रमाकांवर सतत खेळत आहेत. तथापि, शुभमन गिलची कामगिरी देखील आतापर्यंत काही विशेष झाली नाही परंतु त्याचे आकडे जयस्वालपेक्षा चांगले आहेत.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिल हा अशा खेळाडूंपैकी एक आहे जो टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. गिलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मागील सामन्यात 44 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने आयपीएलच्या 2024 च्या हंगामात सहा सामन्यांत 151.78 च्या स्ट्राईक रेटने 255 धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गिलची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 आहे.
युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालचा मागील 5 डावात स्कोअर 24, 5, 10, 0, 24 असा राहिला आहे. म्हणजे 5 डावात फक्त 63 धावा. गेल्या मोसमात अनकॅप्ड खेळाडू म्हणून 600 हून अधिक धावा करून इतिहास रचणाऱ्या जयस्वालची यंदाची कामगिरी निराशाजनक, अनअपेक्षित आहे. गेल्या एका वर्षातील प्रत्येक फॉरमॅटमध्ये यशस्वीचा फॉर्म लक्षात घेता हे विशेषतः त्रासदायक आहे, कारण T20 विश्वचषक 2024 हा फार दूर नाही.
या युवा फलंदाजाचे फॉर्ममध्ये येणे भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचे आहे कारण यशस्वी जैस्वालकडे रोहित शर्मासह सलामीच्या फलंदाजीसाठी आवश्यक असलेली स्फोटक खेळीची क्षमता आहे.





