T20 World Cup 2024, Harbhajan Singh : आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या संघाबाबतही निवड समितीने शोध मोहीम तीव्र केली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर निवड समितीचे बारीक लक्ष असल्याचे बोलले जात आहे. मात्र, वरिष्ठ खेळाडूंना संधी द्यायची की नव्या-जुन्याची सांगड घालायची, हे आव्हान आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख 1 मे ठेवण्यात आली आहे. त्याआधी संघाची घोषणा करायची आहे.
दरम्यान, अनेक दिग्गजांनी आपापल्या संघांची निवड केली आहे. भारताला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या हरभजन सिंगनेही आपल्या संघाचा खुलासा केला आहे. भज्जीने आपल्या संघातून हार्दिक पांड्या आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना वगळले आहे.
हार्दिक पांड्या झगडत आहे फिटनेसशी…
हार्दिक पांड्यासमोर फिटनेसचे आव्हान आहे, असे भज्जीचे मत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही तो चांगली कामगिरी करू शकत नाही. अशा स्थितीत तो बाहेर फेकला गेला आहे. पंड्याने आतापर्यंत आयपीएल 2024 स्पर्धेत 8 सामन्यात केवळ 151 धावा केल्या आहेत. गोलंदाजीही विशेष नव्हती. त्याने 8 सामन्यात फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. भज्जीने पांड्याच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश केला आहे. यामागे फिरकीपटूंविरुद्धचे आक्रमण हे कारण सांगितले जात आहे. शिवम आयपीएलमध्ये खूप घातक ठरत आहे. त्याने 8 सामन्यात 51.83 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत.
पंत आणि सॅमसन यांना यष्टिरक्षकांमध्ये स्थान…
यासोबतच हरभजनने यष्टिरक्षकाची निवडही व्यक्त केली आहे. वरिष्ठ खेळाडू केएल राहुलला बाहेर करून भज्जीने आश्चर्यचकित केलं आहे. केएल राहुलने आतापर्यंत 8 सामन्यात 37.75 च्या सरासरीने आणि 141.12 च्या स्ट्राईक रेटने 302 धावा केल्या आहेत. त्याऐवजी हरभजनने ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला स्थान दिले आहे. संजूने 8 सामन्यात 3 अर्धशतकासह 314 तर पंतने 9 सामन्यात 3 अर्धशतकासह 342 धावा केल्या आहेत. भज्जीने अनेकदा संजू सॅमसनचे कौतुक केले आहे.
Harbhajan Singh picks his Indian team for the T20I World Cup on Star Sports. pic.twitter.com/UcNC314q34
— Johns. (@CricCrazyJohns) April 25, 2024
हरभजन सिंगचा T-20 विश्वचषक संघ :- रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, आवेश खान, जसप्रीत बुमराह, मयंक यादव आणि अर्शदीप सिंग.