Salman Khan House Firing Case – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठा गौप्यस्फोट झाला. सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना 40 गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, आरोपींनी फक्त पाचच गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे.सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. जेणेकरून पोलीस त्यांना कपड्यावरून ओळखू नयेत.
त्याशिवाय, हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वायफायने जोडलेला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली.
यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींना मदत पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
सलमान गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने 29 एप्रिल दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.