मुंबई – करोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. मुंबईत बुधवारी तब्बल 2377 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर करोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढ झपाट्याने होत असल्याने मुंबईतील काही मोठ्या कोविड रुग्णालयांत बेड शिल्लक नसल्याची स्थिती आहे.
सेव्हन हिल्स हाॅस्पिटलचे प्रमुख डाॅ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हाॅस्पिटलमध्ये 1550 बेड आहेत. ते सर्व भरलेले आहेत. नवीन रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत. नव्या रुग्णासाठी पहिले रुग्ण डिस्चार्ज होण्याची वाट पाहावी लागत आहे. मात्र, करोना रूग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे आज सेव्हन हिल्स रूग्णालयाला भेट देणार आहेत.
दरम्यान, मुंबईत दररोज करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. येथील गर्दीच्या ठिकाणच्या बाजारपेठा दूसरीकडे हलविण्यात येणार असून रात्रीच्या संचारबंदीबाबतही गांभिर्याने विचार सुरू आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
बुधवारी राज्यात 23179 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली होती. तर राज्यभरात करोनामुळे 84 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मोठ्या महानगरांमध्ये करोना वेगाने पसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आरोग्य यंत्रणेकडून आवाहन करण्यात येत आहे.